जळगाव मिरर । २२ ऑक्टोबर २०२२
देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. आज दिवाळीचा पहिला दिवस अर्थात धनत्रयोदशी. ज्या देशात जाऊ तिथं दिवळी साजरी करण्याची वेगळी पद्धत पाहायला मिळते. वेगळा फराळ, शुभेच्छा देण्याची वेगळी पद्धत पाहायला मिळते. अशीच पद्धत महाराष्ट्रातही आहे बरं का. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सण साजरे करण्याची अनोखी पद्धत आहे तशीच भाषाही अनोखी आहे. प्रत्येक भाषेला त्याचा वेगळा गोडवा आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्या भाषा माहितीही नसतील. अशीच एक भाषा सर्वासमान्यांपर्यंत पोहचवाऱ्या माहोल मुलींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलींनी यावेळी असे काही शब्द आणलेत की जे ऐकून सर्वांना हसू येईल.
या माहोल मुली म्हणजे अभिनेत्री भार्गवी चिरमुली, समिधा गुरू, मृणाल देशपांडे आणि सई रानडे. या चौघीजणी मिळून ‘माहोल मुली’ नावाने इन्स्टाग्राम रील्स शेअर करत असतात. यामध्ये प्रमाण मराठी भाषेतील काही शब्द व्हराडी भाषेत कसे बोलले जातात किंवा त्यांना पर्यायी व्हराडी शब्द काय आहेत हे सांगतात. चौघीचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. यावेळी दिवाळीत सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे पर्यायी शब्द सांगून सर्वांच्या ज्ञानात आणखी भर पाडली असंच म्हणायला हवं.