
जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२३
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अपहरण झालेल्या सात वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळून आल्यानंतर गुरुवारी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने दगडफेक केली. यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. या जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
नऊ वर्षीय बालिकेचा मृतदेह मक्याच्या चान्याखाली आढळून आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. यानंतर गुरुवारी खळ्याचा मालक स्वप्नील विनोद पाटील (वय १९) यास एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अधिक तपासासाठी त्याला भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या संशयितास पोलिसांनी घटनास्थळी आणले. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला आमच्या ताब्यात देण्याची मागणी करीत दगडफेक केली.
अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करीत आम्हाला तपासात सहकार्य करा. तुम्हाला नक्की न्याय देऊ, असे सांगितले. यानंतर ग्रामस्थांनीही शांततेची भूमिका घेतली. गोंडगाव येथील बालिका मृत्यू प्रकरणाचा मुद्दा आमदार किशोर पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाला कारवाईचे आदेश दिले.





















