मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महाविकास आघाडी सरकार पाय उतार झाल्यापासून शिवसेनेचे 40 आमदार नॉटरिचेबल झाल्यानंतर शिंदे गट स्थापन झाल्यापासून ते फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यापर्यंत कुणीही राजकारणात काय होवू शकेल असे ठामपणे सांगू शकलेले नाही व येत्या काही दिवसात शिवसेनेची पारंपारिक सभा असलेली दसरा मेळावाही शिंदे गट त्यांच्याकडे ओढून घेण्यासाठी खूप प्रयत्न सुरु आहे. त्यापाठोपाठ भाजपचे फडणवीस यांच्यासह काही नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेवून भाजप मनसे युतीची चर्चा केली का? ते ही अद्याप कुणीही सांगू शकत नाही. तर दोन दिवसाआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतिर्थावर जावून भेट घेतल्याने राज्यातील जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेचा होतोय् कि शिंदे गटाचा की शिंदे गटातून राजगर्जना होतेय्. याकडे पाहणे औत्सुकतेचे राहणार आहे. आजच्या या घडामोडी पाहता दसरा मेळावा नेमका कुणाचा होणार किंवा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर कोणाची तोफ धडाडणार? याबाबत चार शक्यता आहेत.
पहिली शक्यता : उद्धव ठाकरे स्वत: भाषण करतील, पण…
दसरा मेळाव्याबद्दल पहिली शक्यता म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: नेहमीप्रमाणे भाषण करतील. त्यांच्या बाजूने दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेला परवानगीसाठी विनंती देखील करण्यात आली आहे. पण शिवसेनेची दसरा मेळावासाठीची ही विनंती अद्याप मान्य करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनदेखील दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागणारं पत्र पाठवण्यात आलं आहे. शिंदे गटाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आपण खरे वारसदार आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच दसरा मेळावा आयोजित होईल, असा दावा करण्यात आला आहे. पण दरवर्षीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरेंना परवानगी मिळाली तर ते शिवाजी पार्कच्या मैदानावर दसरा मेळावा भरवतील आणि भाषण करतील. शिवाजी पार्क मैदानावर समजा परवानगी मिळाली नाही तरी कोणत्यातरी सभागृहात किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनदेखील उद्धव ठाकरे दसऱ्याच्या दिवशी संबोधित करु शकतात. विशेष म्हणजे त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वाधिक राहील.
दुसरी शक्यता : एकनाथ शिंदे गट शिवाजी पार्क मैदानात घेणार दसरा मेळावा
दुसरी शक्यता म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाला कदाचित शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळू शकते. कारण ते राज्यात सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांना कदाचित सभेसाठी परवानगी मिळू शकते. विशेष म्हणजे दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी स्वत: मुंबई महापालिकेला परवानगीसाठीचं पत्र पाठवलं आहे. त्यामुळे त्यांना कदाचित परवानगी मिळू शकते. त्यांना परवानगी मिळाली तर एकनाथ शिंदे गट मोठ्या थाटात दसरा मेळावा भरु शकतो.
तिसरी शक्यता : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक सध्या वाढताना दिसत आहे. याशिवाय भाजपसोबतही मनसेचे संबंध सुधारले आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काहीतरी वेगळं राजकीय समीकरण बघायला मिळेल, अशी चर्चा रंगली आहे. शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबतची याचिका शिवसेनेने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. या याचिकेचा शिंदे गटाच्या विरोधात निकाल लागला तर त्या आमदारांना मनसे किंवा भाजप पक्षात सहभागी होण्याचा पर्याय असेल. या सर्व घडामोडी पाहता शिंदे गटाने दसरा मेळावा आयोजित केला तर या मेळाव्याला राज ठाकरेंनादेखील आमंत्रण दिलं जावू शकतं आणि या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडण्याची शक्यता आहे.
चौथी शक्यता : राज ठाकरेच दसरा मेळावा घेणार
चौथी शक्यता म्हणजे राज ठाकरे यांच्या नेतृत्वातच दसरा मेळावा भरवला जाऊ शकतो. कारण मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबाबत सूचक ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटरवर महाराष्ट्र सैनिकाच्या नावाने पत्र शेअर केलं आहे. त्यामध्ये राज ठाकरेंना दसरा मेळावा आयोजित करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या पत्रात शिवसेना आणि शिंदे गट दोघांना घरचा आहेर देण्यात आला आहे आणि राज ठाकरेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार असल्याचा उल्लेख करण्यात आलं आहे. मनसेच्या गोटातील या हालचाली पाहता कदाचित शिवाजी पार्कच्या मैदानावर दसरा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडण्याची शक्यता आहे.