जळगाव मिरर | १३ जानेवारी २०२५
तालुक्यातील कुसुंबा येथे पत्नी बाहेरगावी तर मुलगा बाहेर खेळत असताना ४६ वर्षीय प्रौढाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. लीलाधर कौतिक पाटील असे मृताचे नाव आहे. मुलगा घरी आल्यानंतर त्याला वडिलांनी गळफास घेतलेला दिसला.
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम कामगार लीलाधर पाटील यांच्या पत्नी गावी गेलेल्या होत्या. तर त्यांचा ११ वर्षीय मुलगा बाहेर खेळत होता. त्यावेळी लीलाधर पाटील यांनी गळफास घेतला. काही वेळाने मुलगा घरात आला तेव्हा त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. ते पाहून तो आक्रोश करीत शेजारी राहणाऱ्या काकांकडे गेला व घटना सांगितली. त्यानंतर लीलाधर पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, लीलाधर पाटील यांनी आत्महत्या करण्याचे कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.