जळगाव मिरर | १२ जुलै २०२५
येत्या काही महिन्यावर राज्यातील स्थानिक निवडणूक लागणार असल्याने सर्वच पक्षांनी आता तयारी सुरु केली असतांना आता राज व उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यानंतर हे दोघे भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढतील असा दावा केला जात आहे. याविषयी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सकारात्मक भूमिका घेतली जात आहे. तर राज या प्रकरणी सावध पाऊले टाकताना दिसून येत आहेत. पण आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका विधानामुळे राज ठाकरे आपल्या भावाला हात दाखवत भाजपसोबत जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
रवींद्र चव्हाण शनिवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, राजकारणाक केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी स्टेटमेंट दिले होते की, कार्यकर्त्यांनी युतीच्या संदर्भात काहीही बोलू नये. चर्चा करू नये. त्यामुळे प्रत्येक पक्ष व प्रत्येक संघटना आगामी निवडणुकांच्या दिशेने अत्यंत सावधपणे पाऊले टाकत असल्याचे स्पष्ट होते. राज ठाकरे हे अतिशय समजदार आहेत. त्यांचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे हे दोघेही मुंबईच्या दृष्टिकोनातून जे जनतेचे हित आहे, त्यानुसारच पाऊले उचलतील.
रवींद्र चव्हाण यांच्या या विधानामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे उद्धव यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यावेळी कधी नव्हे एवढी मनसेशी युती करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. या पक्षाचे सर्वच नेते राज यांच्यासोबत युती करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा विचार मांडत आहेत. त्यातच रवींद्र चव्हाण यांनी राज व फडणवीस हे दोघेही मुंबईच्या हिताचा निर्णय घेतील असे विधान केल्यामुळे राज पुन्हा उद्धव यांच्यापासून दूर जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे, रवींद्र चव्हाण यांनी यावेळी आपला पक्ष संपूर्ण ताकदीने संघटनात्मक मजबुतीसाठी प्रयत्न करत असल्याचेही स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टी आमची टीम ही संपूर्ण ताकदीने संघटनात्मकदृष्ट्या मजबूत कशी होईल या दृष्टिकोनातून अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. या संघटन पर्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात भाजपची राष्ट्रीयत्वाला धरून असणारी विचारधारा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाजपच्या विस्तारासाठी जे काही आवश्यक आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले.
