जळगाव मिरर | ३ नोव्हेबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सुरु होण्याआधी महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं आहे. अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर देत या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. आव्हाडांचंं हे वक्तव्य अजित पवार यांच्या आई-वडिलांचा अपमान करणार आहे. आव्हाडांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचं समर्थन आहे का? जर समर्थन नसेल तर मग शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे जोडे मारून आव्हाडाचंं थोबाड फोडणार का? असा सवाल मिटकरी यांनी केला आहे. सोबतच आव्हाड यांच्या टीकेला मुंब्रामध्ये जाऊन उत्तर देणार असल्याचा इशाराही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. यापूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या कन्येविरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं. आता आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
‘ही पाकीटमारांची टोळी आहे, पाकीटमारांची. तुमच्यात हिंमत होती, अजित पवार मर्द की औलाद होते तर म्हणाले असते शरद पवारांनी तुतारी निशाणी घेतली. मीही दुसरं चिन्ह घेऊन लढतो असं म्हटलं असतं तर आपण त्याला मर्द म्हणतो. तुम्ही काकांनी वाढवलेली पार्टी चोरून ती माझी पार्टी आहे म्हणत देशात फिरत आहात,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.