जळगाव मिरर | ३१ जानेवारी २०२६
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना जळगावकर नागरिकांनी जड अंतःकरणाने भावपूर्ण आदरांजली वाहिली. शुक्रवार दि. ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे समस्त जळगावकर नागरिकांतर्फे पुष्प अर्पण, मेणबत्त्या प्रज्वलित करून तसेच तीन मिनिटांचे मौन पाळत स्व. अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या श्रद्धांजली सभेला जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या कार्याची, नेतृत्वाची आणि जनसामान्यांशी असलेल्या नात्याची आठवण काढत भरलेल्या मनाने जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी अनेक नागरिक भावूक झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान “अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे” तसेच “जब तक सूरज-चाँद रहेगा, दादा आपका नाम रहेगा” अशा घोषणा देत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले होते.



















