जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२५
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या पथकाने महिलेच्या विनयभंग प्रकरणातील ९ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला मुंबईतून अटक करण्यात यश मिळवले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. २५ नोव्हेंबर रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ९७/२०१६ भादंवी कलम ३५४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी युवराज नामदेव पवार (रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव) हा गुन्हा झाल्यापासून तब्बल ९ वर्षे फरार होता. महिलांविरुद्धच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामुळे आरोपीचा शोध घेणे आवश्यक होते. दरम्यान, हा आरोपी मुंबईत असल्याची गोपनीय माहिती मिळताच प्रभारी अधिकारी तथा स.पो.नि. प्रविण दातरे यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली.
पथकातील अधिकारी वअंमलदारांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपीचा माग काढत अंधेरी (मुंबई) येथून त्याला शिताफीने ताब्यात घेतले आणि मेहुणबारे पोलीस ठाण्यात दाखल केले. तर न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, पो.उ.नि. सुहास आव्हाड, विकास शिरोळे, पो.हे.कॉ. शांताराम पवार, पो.कॉ. विनोद बेलदार, पो. कॉ. संजय लाटे यांनी केली.




















