जळगाव मिरर | २५ जानेवारी २०२६
जळगाव जिल्ह्यातील मोठे औद्योगिक प्रकल्प शेजारच्या तालुक्यांकडे वळत असल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त करत स्वपक्षीय आमदार आणि मंत्र्यांवर शालजोडीतील शब्दांत टोलेबाजी केली. “कोकाकोला प्रकल्प जामनेरला गेला, आता १५ हजार कोटींचा प्रकल्प चाळीसगावला गेला. मग आम्ही फक्त बघत बसायचं का? आपण आमदार आहोत की नाही? भानगड केल्याशिवाय काहीच मिळत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित कार्यशाळेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला. “बहुतेक पुढच्या वेळी मलाही ‘कोट’ घालून दावोसला जावं लागेल, तेव्हाच माझ्या वाट्याला काही मिळेल,” असे मिश्किल वक्तव्य करत त्यांनी व्यासपीठावरून फटकेबाजी केली. या वक्तव्यामुळे सभागृहात हशा पिकला असला, तरी त्यामागील राजकीय नाराजी स्पष्टपणे जाणवत होती.
चाळीसगावसाठी १५ हजार कोटींचा प्रकल्प आणण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी दावोसला उपस्थिती लावली होती. यावर अप्रत्यक्ष भाष्य करत गुलाबराव पाटील म्हणाले की, “जामनेरला उद्योग आले, चाळीसगावला आले. आपण दावोसमध्ये गेलो असतो, तर आपल्यालाही काही मिळालं असतं. आता पुढच्या वेळी मी पण दौरा काढतो आणि कोट घालून जातो.”
दरम्यान, बँकांकडून छोट्या उद्योजकांना होणाऱ्या त्रासावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “माझी बँकांशी कोणतीही दुश्मनी नाही. पण काही बँका छोट्या उद्योजकांना विनाकारण त्रास देतात. हे वेळीच थांबवा. अन्यथा मला बँकांशी थेट दुश्मनी घ्यावी लागेल. गुलाबराव पाटील काय चीज आहे, हे त्यांना कळेल,” अशा शब्दांत त्यांनी बँक अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला.
जळगाव एमआयडीसीला ‘डी प्लस’ दर्जा मिळवतानाच्या आठवणी सांगताना त्यांनी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही निशाणा साधला. “आम्ही ११ आमदार निवडून दिले, सरकार आमच्यामुळेच बसले. तरीही आम्हाला दूर ठेवण्यात येत होतं. देसाई साहेब आमच्याकडे पाहायलाही तयार नव्हते. अखेर एका बैठकीत मी त्यांना स्पष्ट विचारलं – ‘आम्ही काय दुसऱ्याची लेकरं आहोत का?’ त्यानंतर बराच गदारोळ झाला आणि शेवटी जळगावला न्याय मिळाला,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
गुलाबराव पाटील यांच्या या परखड आणि मिश्किल वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.




















