
पाचोरा : प्रतिनिधी
भडगाव येथील विट भट्टीवर काम करणारा मजूर रविवारी रात्री जळगांव येथून भडगावकडे येत असतांना नांद्रा गावाजवळ चारचाकी वाहन मोटारसायकलला धडकल्याने ४० वर्षाच्या मोटारसायकल स्वाराचा जागीच दुर्दैवी ठार झाल्याची घटना घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी मयताचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मयतास रुग्णालयात दाखल करण्यासाठी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सहकार्य केले.
भडगाव येथील राजू रामदास कुंभार (वय – ४०) हा दि. ११ रोजी एम. एच. – १९ – बी. वाय. ५८९६ ह्या मोटारसायकल वरून जळगांव येथून भडगावला परत येत असतांना रात्री १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील नांद्रा गावाजवळ पाचोऱ्याकडून जळगांव कडे अतिशय भरधाव वेगाने एम. एच. १५ ई. एक्स. ८१९२ ह्या वाहनाने समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत राजू कुंभार हा रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला असतांनाच पाठीमागून त्याचे नातेवाईक मोटारसायकल वरून येत असल्याने त्यांनी त्यास उपरार्थ पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत असल्याचे सांगितले.
चारचाकी वाहन चालक संजय मोहरीर यांचे विरुद्ध मयताचा भाऊ संजीव रामदास कुंभार याने पोलिसात तक्रार दाखल केली. मयत राजू याचे पाच्छात दोन भाऊ, दोन लहान मुले, दोन मुली व पत्नी असा परिवार असून त्यांचेवर भडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.




















