
निंभोरा येथे उद्योजक शिबिर उत्साहात संपन्न.
जळगाव मिरर | २ फेब्रुवारी २०२६
येथे दि.३१ जानेवारी रोजी कृषीतंत्र विद्यालयात निंभोरा व पंचक्रोशीतील छोटे व्यापारी तसेच मध्यम व मोठ्या व्यावसायिकांसाठी उद्योजक शिबिर सामाजिक कार्यकर्ते सुनिल कोंडे यांनी आयोजित केले होते.यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून तरुणांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता व्यवसायातून उद्योजक व्हावे व आपल्या परिसरात समृद्धी आणण्याचे आवाहन या उद्योजक मेळाव्यात बोलताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीतंत्र विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुऱ्हानपूरचे उद्योजक हर्षितसिंग ठाकूर,मधुस्नेह परिवाराचे धनंजय चौधरी, सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक सागर रोकडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सुनील कोंडे यांनी केले.गावातील तसेच पंचक्रोशीतील व्यवसाय वाढीसाठी सोशल मिडिया,जाहिरात,सेवा सुविधा याबाबत लहान मोठ्या व्यावसायिकांनी आपल्या अडचणी चर्चेतून मांडल्यानंतर आमदार सत्यजित तांबे,हर्षितसिंह ठाकुर, धनंजय चौधरी,व्यवस्थापक सागर रोकडे यांनी याबाबत मार्गदर्शनातून चर्चा केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक बोंडे यांनी तर आभार प्रदर्शन ललित कोळंबे यांनी केले.





















