मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका मोठ्या घोषणेमुळं सर्व सामान्य नागरिकांकडून मोठी नाराजी व्यक्त केली जातेय. सोशल मीडिया अनेक विनोद आणि मिम्सही सध्या फिरत आहेत. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 24 मार्च रोजी विधानसभेत मुंबईत आमदारांसाठी आता 300 घरं बांधणार असल्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडीचं सरकार केवळ बोलणार नाही तर करुन दाखवणार, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सर्वस्तरातून टीका होऊ लागल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सरकारला फटकारलं आहे.
केवळ आमदारांसाठी गृहनिर्माण योजना नको. गृहनिर्माण योजनेतील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे, असं शरद पवार म्हणाले. मात्र, आमदारांना घर देताना त्याची योग्य ती किंमत घेतली पाहिजे, असंही पवार यावेळी म्हणाले. इतकंच नाही तर शरद पवार राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत पक्षातील मंत्र्यांशी चर्चाही करणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शरद पवार यांनी आमदारांच्या घराच्या निर्णयावरुन सरकारला फटकारल्याची चर्चा सध्या सुरु आहे.