दोन वर्षांपूर्वी कोव्हिड-19च्या जागतिक साथीला चीनमधून सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच चीनने आतापर्यंतचा सर्वांत मोठा लॉकडाऊन जाहीर केलाय. चीनमधलं शांघाय शहर पुढचे 9 दिवस दोन टप्प्यांमध्ये बंद राहील.
9 दिवसांच्या या लॉकडाऊनच्या काळात शांघाय शहरातले अधिकारी कोव्हिड-19 साठीच्या चाचण्या करणार आहेत.
शांघाय ही चीनची आर्थिक राजधानी मानली जाते. चीनसाठी महत्त्वाच्या या शहरात गेल्या महिनाभरापासून कोरोना व्हायरसच्या संसर्गाची नवीन लाट दिसून येतेय. आंतरराष्ट्रीय आकडेवारीशी तुलना केल्यास शांघाय शहरातील रुग्णसंख्या फारशी नाही.
आर्थिक फटका बसू नये म्हणून आतापर्यंत शहरात लॉकडाऊन लावण्यात आला नव्हता. पण शनिवारी 26 मार्चला शांघायमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळले. कोव्हिडची साथ सुरू झाल्यापासूनचा हा सर्वांत मोठा आकडा होता.त्यामुळेच ‘झिरो कोव्हिड पॉलिसी’ अवलंबलेल्या चीनने शांघाय शहरात लॉकडाऊन लावत चाचण्या सुरू केल्या आहेत.
दोन टप्प्यांत होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये 1 एप्रिलपर्यंत शहराची पूर्व बाजू बंद राहील तर 1 ते 5 एप्रिल शांघायची पश्चिम बाजू बंद राहील.
या काळात सार्वजनिक वाहतूक बंद राहणार असून ऑफिसेस आणि कंपन्यांनी घरून काम करावं वा काम थांबवावं असं सांगण्यात आलंय.
शांघायमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे, म्हणून पहिल्यांदाच संपूर्ण शहर बंद करण्यात येतंय. चीनमध्ये गेल्या काही काळात आढळलेल्या कोव्हिड रुग्णांची आकडेवारी जगातल्या इतर देशांच्या तुलनेत कमी असली, तरी यामुळे चीनच्या ‘झिरो कोव्हिड’ धोरणासमोर आव्हान उभं होतं. ताबडतोब लॉकडाऊन लावणं, निर्बंध अंमलात आणणं या पर्यायांचा वापर करत मोठी लाट टाळणं, हे या धोरणाचं उद्दिष्टं आहे. पण या शून्य कोव्हिड धोरणामुळे सतत कराव्या लागणाऱ्या चाचण्यांबद्दल काही नागरिकांनी नाराजीही नोंदवली आहे. रविवारी 27 एप्रिलला चीनमध्ये 4,500 नवीन रुग्ण आढळल्याचं चीनच्या हेल्थ कमिशनने म्हटलंय.