अमळनेर : प्रतिनिधी
वडिलांच्या गरिबीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून अमळनेर येथील मीनल यशवंत बडगुजर हिने सीए ( चार्टर्ड अकाऊंट) परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे. तिचा निकाल जाहीर होताच पोरीने शिक्षणाचे चीज केले म्हणून आईवडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. तर बडगुजर समाजात खानदेशातून सीए होणारी ती पहिली मुलगी ठरली. तिने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अमळनेर येथील यशवंत बडगुजर यांचे छोटेसे किराणा दुकान आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असतानाही मुलगी मीनल हिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. मीनल आधीपासूनच अभ्यासात हुशार असल्याने तिने निवडलेल्या सीएच्या करिअरसाठी ते तिच्या पाठीशी उभे राहिले.
जळगांव, धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यातून बडगुजर समाजातील सीए होणारी ती पहिलीच मुलगी ठरली आहे. त्यामुळे तिच्या या दैदीप्यमान यशाचे माजी आमदार साहेबराव पाटील, स्वप्ना विक्रांत पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, गिरीश बडगुजर यांच्यासह नातेवाईक, कुटूंबीय आणि प्रतिष्ठीतांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.