प्योंगयांग : रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या युद्धामुळे जगावर चिंतेचं सावट असताना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने नवी घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे. उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीनंतर आता आणखी धोकादायक शस्त्रास्त्रांची निर्मिती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. उत्तर कोरियाच्या रक्षणासाठी आणखी मजबूत शस्त्रास्त्रांची निर्मिती करा, अशा सूचना किम जोंग उन याने देशातील लष्कराच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उत्तर कोरियाने काही दिवसांपूर्वीच आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. त्यानंतर आता या देशाकडून आण्विक हल्ल्यासाठी अधिक उपयुक्त असणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या चाचणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने याबाबत माहिती देत म्हटलं आहे की, ‘उत्तर कोरिया आपला शस्त्रसाठा आणखी आधुनिक करण्यासाठी लवकरच नव्या चाचण्या करू शकतो. यामध्ये आण्विक उपकरणांच्या चाचणीचाही समावेश असेल.’ किम जोंग उन याच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाने गुरुवारीच ह्वासोंग-१७ या क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. या चाचणीमध्ये सामील असणाऱ्या वैज्ञानिकांची किम जोंग उने याने भेट घेत देशाचं संरक्षण करण्यासाठी आणखी मजबूत शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. ज्या देशाकडे मोठं लष्करी सामर्थ असतं आणि आधुनिक शस्त्रास्त्र असतात तोच देश युद्धाची शक्यता रोखू शकतो आणि अशा देशाला इतर कोणताही देश नियंत्रित करू शकत नाही, असं किम जोंग उनने सांगितलं. दरम्यान, एकीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे तणाव निर्माण झालेला असतानाच किम जोंग उन याच्या या आक्रमक भूमिकेमुळे जगाची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.