जळगाव ः प्रतिनिधी
जळगाव जिल्हा समस्त शिवसैनिकांतर्फे ‘आक्रोश मार्चा’चे आयोजन शनिवारी दु.2 वाजता शिवतिर्थ मैदानावरुन करण्यात आले होते. या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे नेते संजय सावंत, विलास पारकर यांनी केले. याप्रसंगी जिल्ह्याती शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काळे कपडे परिधान करून निषेध नोंदविला.
जिल्हा शिवसैनिकांच्यावतीने शिवसेनेशी जिल्ह्यातील आमदारांनी बंडखोरी करून ते शिंदे गटात गेले होते. हा सर्व राजकीय घडामोडी राज्यासह जळगाव जिल्ह्याने गेल्या दोन आठवड्यापासून अनुभवत होते. त्यानंतर दि.30 रोजी भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाने सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर 2 जुलै रोजी जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्यावतीने ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून गावातून शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र येवून या घटनेचा निषेध म्हणून उध्दव ठाकरे यांना समर्थ देत होते. तर जिल्ह्यातील ज्या आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केली आहे. त्याच्या विरुध्द घोषणाबाजी यावेळी मोठ्या संख्येने झाली.जय भवानी जय शिवाजी, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कि जय, उद्धव साहेब आगे बढो, आदित्य साहेब आगे बढो, अशा घोषणांनी जळगावाचे वातावरण शिवमय करून टाकले होते.
हा मोर्चा शहरातील शिवतिर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास नमन करून या मोर्चाने पुढे आगेकूच केली तर हा मोर्चा अजिंठा चौफुलीपर्यंत या मोर्चाचे आयोजन होते. यावेळी रस्त्यामध्ये असलेल्या वैकुंठधामाजवळ शिवसैनिकांनी आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे रस्त्यावरच दहन केल्याने अजून शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यानंतर हा मोर्चा पुढे अजिंठा चौफुलीच्या दिशेने आगेकूच केली.
आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी
शिवसेनेशी जिल्हयातील आमदारांनी बंडखोरी केल्याबद्दल शिवसैनिकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. जिल्ह्यातील शिवसेनेचे आ.गुलाबराव पाटील, आ.किशोर पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.लताताई सोनवणे यांच्यासह स्वतः शिवसैनिक म्हणून घेणारे अपक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्या नावाने शिवसैनिकांनी बोंबा मारुन निषेध व्यक्त केला.
यावेळी आंदोलनात शिवसेनेचे नेते गुलाबराव वाघ, विष्णू भंगाळे, समाधान महाजन, शरद तायडे, गजानन मालपुरे, डॉ.हर्षल माने, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, नितीन लढा, दीपक राजपूत, नाना महाजन, किशोर भोसले, यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी घोषणाबाजी करून जळगावाला पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या आवाजाने दणाणून टाकले होते.




















