जळगाव : प्रतिनिधी
राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली असून एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे असे दोन गट पहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातही याचा परिणाम पहायला मिळत असून धरणगाव तालुक्यात शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहेत. धरणगावचे उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुख यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी शनिवारी आपआपले पदाचे राजीनामे दिले असून उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे यांना पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या पदाचे राजीनामे पाठविल्याची माहिती मिळाली आहे.
त्याचप्रमाणे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधीगावामधील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांनी सामूहिक राजीनामे व शिंदे गटाला समर्थन दर्शविले आहे. पाळधी येथील विश्वनाथ महाजन उर्फ आबा माळी, चंदू इंगळे, पिटु कोळी, हर्षल पाटील, पप्पू माळी, दीपक श्रीखंडे, अरुण पाटील, प्रशांत झंवर, चंदन कळमकर, दानिश पठाण, गजानन ठाकूर, संजय महाजन, आदींनी सामुहिक राजीनामे दिले आहेत.




















