मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आलेले आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुखासह आदित्य ठाकरे कार्यकर्त्याच्या भेटीगाठी व बैठकांवर जोर देत आहेत. परंतु आता थेट ठाकरे कुटुंबातच फूट पाडण्यात शिंदे यशस्वी झाल्याचे दिसत आहे.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नातू निहार ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील , अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निहार ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार असल्याची माहिती आहे.
निहार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असून बिंदुमाधव ठाकरे यांचे ते पुत्र आहेत. उद्धव ठाकरे व जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका तर राज ठाकरे हे त्यांचे चुलत काका आहेत. निहार ठाकरे यांचा विवाह काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटीलसोबत झाला आहे. अंकिता पाटील या सध्या काँग्रेस पक्षाकडून ज़िल्हा परिषद सदस्य आहेत. वडिलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देखील अंकिता काँग्रेसमध्येच आहेत.
शिवसेनेचे अनेक नेते शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेना आमचीच आहे असे म्हटले असून पक्षाचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही त्यांनी दावा केला आहे. दरम्यान शिंदे गटाने बंद पुकारल्यानंतर त्यांच्या गटातील १३ आमदारांना अपात्रतेच्या कारवाईची नोटीस देण्यात आली होती. याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. यावर आता १ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.




















