नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांनी युतीविषयी एक तास चर्चाही केली होती.मलाही भाजपसोबत युती करायची आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांना म्हणाले होते. पण त्याच दरम्यान भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आल्यामुळे भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व नाराज झालं. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत संसदेत शिवसेनेचा स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याची माहिती दिली. यावेळी शिंदेंनी शिवसेनेचे मुख्य गटनेता अशी ओळख करुन दिलेल्या राहुल शेवाळेंनी ठाकरेंच्या वक्तव्यांचा पाढाच वाचला.
२०१९ चा शिवसेनेचा वचननामा उद्धव ठाकरेंनी बनवला होता. मात्र त्यात उल्लेख असलेल्या एकाही मुद्द्याचा महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये समावेश नव्हता. आमदारांच्या बंडानंतर २१ जूनला शिवसेना खासदारांना वर्षावर बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी आम्ही सांगितलं की एनडीएसोबत युती करा, त्यावर ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी तुमची भूमिका आनंदाने स्वीकारेन’ असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावा राहुल शेवाळेंनी केला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपसोबत युती आवश्यक आहे, असा आम्हा शिवसेना खासदारांचा आग्रह होता, मात्र उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा सूर कायम ठेवला. आम्ही विरोध करत त्यांना आपापल्या मतदारसंघातील वस्तुस्थिती सांगितली, मात्र त्यांनी सहकार्य केलं नाही, असं राहुल शेवाळे म्हणाले.
