मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. फडणवीस- ठाकरे भेटीमुळं राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा गुरुवारी रंगली होती. त्यामुळं या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, राज ठाकरे यांनी यावर एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडाळीनंतर राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. एकनाथ शिंदेंना आपल्या बाजूने वळवल्यानंतर भाजपनं आपला मोर्चा राज ठाकरे यांच्याकडे वळवल्याचे चित्र होते. शिवसेनेला शह देण्यासाठी आता फडणवीस राज ठाकरे यांच्यासोबत युती करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप अमित ठाकरे यांना मंत्रिपद देऊन पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची चर्चा होती. मात्र, राज ठाकरे यांनी आज या वृत्ताचे खंडन केलं आहे.
आज माध्यमांनी राज ठाकरे यांना अमित ठाकरे यांच्या मंत्रिपदाबाबत विचारलं असता त्यांनी कालची बातमी खोटी, असं एका वाक्यात उत्तर दिलं आहे. त्यामुळं या चर्चांना आता विराम मिळाला आहे.
राज ठाकरे यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांनी पत्राद्वारे नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या शुभेच्छांचा स्वीकार करत आम्ही एकदा थेट भेटायला जाणार आहोत, असं म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीत राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्याचा उद्देश होता, असं सांगण्यात येत आहे. मात्र यापुढेही काहीतरी राजकीय हेतू असल्याचाही संशय राजकीय वर्तुळातून व्यक्त होतोय.
