पाचोरा : प्रतिनिधी
मुंबई महानगर पालिकेमध्ये उद्यान अधीक्षक या अत्यंत महत्त्वाच्या पदावर कार्यरत असणारे नगरदेवळ्याचे सुपुत्र जितेंद्र परदेशी यांना मुंबई शहरात शाश्वत हिरवळ वाढविण्यासाठी विविध व सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सी. एस. आर. उत्कृष्टता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
उद्यान खात्यांमध्ये काम करतांना त्यांनी आत्तापर्यंत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून आत्तापर्यंत त्यांना अनेक नामवंत संस्थामार्फत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्रामुख्याने महापालिकेतर्फे देण्यात येणारा पहिला मा. बाळासाहेब ठाकरे गुणवंत अधिकारी पुरस्कार, महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याहस्ते देण्यात आलेला आहे.
मियावाकी या जपानी पद्धतीने मुंबई शहरात जागेचा अभाव असतानाही त्यांनी आत्तापर्यंत चार लाख झाडे लावली आहेत, त्यासाठी त्यांना जपानच्या वाणिज्य दूतावासा मार्फत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. २० मार्च रोजी त्यांना “द सीएसआर जनरल” या आघाडीच्या व प्रसिद्ध मासिकामार्फत त्यांना अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल या मासिकाने दखल घेवून प्रसिध्दी दिली. याशिवाय पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य मान्यवरांना सुद्धा यावेळी गौरवण्यात आले आहे. प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे, पत्रकार राजीव खांडेकर, पोलीस आयुक्त संजय पांडे इत्यादी मान्यवरांना सुद्धा गौरवण्यात आले. त्यांच्या या यशासाठी क्षत्रिय परदेशी समाज व नगरदेवळा ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.