शेंदुर्णी ता.जामनेर : प्रतिनिधी
शेंदुर्णी नगरपंचायत मार्फत शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आहे. स्वच्छता राखण्याचे आवाहन नगरपंचायतीच्या मार्फत करण्यात येत आहे. शहर अधिकच स्वच्छ व सुंदर व्हावे ह्यासाठी नगरपंचायतने आता रात्री सुद्धा शहर साफसफाई करण्याचे निर्णय घेतला आहे. यात व्यवसायिक स्थळे, आठवडे बाजार आदी परिसराचे साफसफाई करण्यात आले.
शहरातील रस्त्यांपासून ते चौक, चौकांमध्ये दिवसा तसेच रात्री स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शहराचा प्रत्येक कानाकोपरा रोषणाईने उजळून निघाला आहे. अभिप्रायात नागरिकच नाही तर यावेळी भिंतींवर रंगवलेले रंगही शहराच्या स्वच्छतेची कहाणी सांगत आहेत. शहर अधिकच स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगरपंचायत ने पूर्ण जोर लावला आहे.
शहरात स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. रस्ते शौचालय, व्यावसायिक, रहिवाशी परिसर, नाले दररोज सफाई केली जात आहे. इतकेच नाही तर शहराला स्वच्छ करण्यासाठी सफाई कर्मचारी कष्ट घेत आहेत. हे शहर स्वच्छ,सुंदर राहण्यासाठी नागरिकांनी घरातून निर्माण होणारा ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा व नगरपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्ष निलेश थोरात यांनी केले.
शहरातील स्वच्छता, साफसफाई कामाला प्राधान्य देवून पावसाळ्यापूर्वी स्वच्छता, सार्वजनिक शौचालय साफसफाई, रस्त्याची साफसफाई, फुटपाथ स्वच्छता तसेच परिसर सुशोभीकरण आदी गोष्टी अद्ययावत ठेवण्याबाबत सूचना मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी दिल्या. पावसाळ्याच्या दृष्टीने नाल्यांची साफसफाई करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शहरातील ज्या भागात पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे तक्रारी येतात त्या भागांमध्ये सर्वात आधी काम सुरू करण्यात येणार असून नाल्यातील घाण काढून नाले व्यवस्थित वाहतील याची व्यवस्था करण्यात येत आहे. मागील वर्षी शहरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे नाल्यात, शहरात सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते. ह्या वर्षी नगरपंचायत स्वतःची यंत्रणा लावून हे काम एक महिना आधीच सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले.