पारोळा: प्रतिनिधी
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी वीज आणि सिंचनाला प्राधान्य देवून शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. ७५ वर्षानंतर देखील शेतकऱ्याला पुरेशी वीज उपलब्ध करून देवू शकत नाहीत हे पाप आहे.नुसत्या गप्पा करून बदल होणार नाही त्यासाठी कृतिशील सरकार असणे ही काळाची गरज असून कृतिशील सरकार लोकशाहीची सर्वात मोठी देणगी असल्याचे आ. चिमणराव पाटील यांनी सांगितले.
पारोळा येथील कृ. उ. बाजार समितीच्या आवारात आ. चिमणराव पाटील यांच्या ७२ व्या वाढदिवसा निमित्त रविवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा ते बोलत होते. व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष चतुर पाटील, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, जळगाव महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील, संपर्क प्रमुख जगदीश सावंत, शहर प्रमुख अशोक मराठे, जि. प.सदस्य नाना महाजन, नगरसेवक मंगेश तांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान २८ आदर्श शेतकऱ्यांना ‘कृषीरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आ.पाटील पुढे म्हणाले की, कृ. उ. बाजार समिती गेल्या अनेक वर्षापासून कृषीरत्न सन्मान हा स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. कोरोनाच्या भयावह आणि कठीण काळात सर्व उद्योगधंदे व्यापार बंद पडले. मात्र शेती आणि शेतीवरील कामे थांबले नाहीत. म्हणून अशा जगाचा पोशिंद्यावर कौतुकाची थाप द्यावी म्हणून कृषिरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात येत असते. आपण जनतेच्या मनातील मंत्री आहोत असे आमदार चिमणराव पाटील यांनी स्पष्ट केले. मला मंत्रीपदाची हाव नाही, असे त्यांनी शेवटी सांगितले तसेच वाढसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करून सर्व उपस्थितांचे आभार मानले,