जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा कारागृहात आणत असतांना पोलीसांच्या हातावर तुरी देवून वाशीम जिल्ह्यातील कैदी पसार झाल्याची खळबळजनक घटना दुपारी घडली. याप्रकरणी कैद्याविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेत असलेला लोणी बुद्रुक ता. रिसोड जि. वाशिम येथील कैदी महेश शिवदास दीक्षे (वय-३०) याची पुढील कारवाईसाठी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर गुरुवार, दि. १९ मे रोजी भुसावळ येथून जळगाव येथील जिल्हा कारागृहात ट्रान्स्फर होण्यासाठी भुसावळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक व पो.कॉ. ईश्वर संजय भालेराव शासकीय वाहनाने जिल्हा कारागृहात दुपारी १२ वाजता आणण्यात आले होते.
कैदी महेश दिक्षे प्रभारी जेल अधीक्षक यांना कागदपत्र दाखवत कैदी हा वेडसर असल्याचे सांगत असतांनाच कैदी महेश दीक्षे हा पोलीस नाईक अमित तडवी यांच्या हाताला झटका देऊन सबजेल पोलीस लाईनच्या गल्लीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. भुसावळ पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. अखेर भुसावळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पोलीस नाईक अमित तडवी यांनी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून कैदी महेश शिवदास दीक्षे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.