पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील वाडी येथील ६० शेतकऱ्याच्या ११७१ क्विंटल कापसाचे पैसे स्थानिक व्यापारी राजेंद्र भिमराव पाटील हे गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या कुटूंबीयासह पसार झाले असून शेतकऱ्यांचे ८५ लाख ९६ हजार ३८३ रुपये घेऊन पसार झाला आहेत.
यातील इंद्रशींग दौलत राजपूत या शेतकऱ्याने २८ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. मात्र गेल्या चार महिन्यांपासून आरोपी सापडत नसल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राकेश खोंडे, रणजित पाटील, रविंद्र पाटील हे पथक आरोपीच्या शोधासाठी नाशिक, धुळे व जळगाव येथे जाऊन माघारी फिरले. शेतकऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून जागृत मंचचे अध्यक्ष निळकंठ पाटील, बाळकृष्ण पाटील यांचे नेतृत्वाखाली वाडी येथील आपल्या मुलाबाळांसह उपोषण सुरू केले आहे.
उपोषण स्थळी पोलिस उपाधिक्षक भारत काकडे, सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, संजय वाघ, अमोल शिंदे यांनी भेटी देऊन उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला. या शिवाय पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंडे यांनीही भ्रमणध्वनीवर संपर्क साधून उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र उपोषण कर्ते कापसाचे पैसे मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे ठाम असल्याने आज उपोषणाचा आठवा दिवस आहे.
शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी उधारीवर कापसाचे बियाणे, औषधे, खते घेतल्याने संबंधित व्यापाऱ्याचा पैसे मागण्यासाठी तगादा लावला आहे. शिवाय दुसऱ्या वर्षाचा खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतीची मशागत कशी करावी व पेरणी कशी होईल या विवंचनेत शेतकरी आल्याने उपोषण सुटता सुटेनासे झाले आहे.