आज सकाळी मध्यप्रदेशातील नर्मदा नदीत बस कोसळलेल्या नदीत सोमवारी सायंकाळपर्यंत १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर यामध्ये
मुर्तिजापूरातील एका सुनेचाही मृत्यू झाला. माहेरी जाण्यासाठी मुर्तिजापूरहून निघाल्यानंतर इंदूर येथे असलेल्या आजारी मावशीला त्या भेटल्या, पण माहेरी अमळनेरला जाताना काळाने झडप घातली अन् माहेरच्या माणसांची अखेरची भेटही घेता आली नाही.
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे सोमवारी, १८ जुलैला सकाळी महाराष्ट्र परिवहनची बस नर्मदा नदीत कोसळली. बसमध्ये असलेल्या ४० प्रवाशांपैकी सोमवारी सायंकाळपर्यंत १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यातील ११ जणांची ओळख पटली असून मृतांमध्ये मूर्तिजापूर येथील एका २७ वर्षीय अरवा मूर्ताझा बोहरा महिलेचाही समावेश आहे. इंदूर येथील मावशीची भेट घेऊन त्या अमळनेरला माहेरी मुक्कामी येत होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 19 जुलैला त्या सासरी मूर्तिजापूरला जाणार होत्या. मात्र त्यांचा नर्मदेत झालेल्या बस दुर्घटनेत मृत्यू झाला.
शेवटची भेट मावशीची
इंदूर येथील आजारी मावशीच्या भेटीसाठी त्या गेल्या होत्या. तेथून माहेर असणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे त्या बसने परतत होत्या. मात्र मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे सोमवारी सकाळी बस नर्मदा नदीत कोसळली. या दुर्घटनेत अनेक कुटुंब उध्वस्त झाली. मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये अरवा मूर्ताझा बोहरा यांचाही समावेश आहे. मावशीची भेट घेऊन माहेरी येण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला. मूर्तिजापूर शहरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. महिलेचे मूर्तिजापूर येथील नातेवाईक मृतदेह आणण्यासाठी निघाले आहे.
प्रसिद्ध उद्योजकाची होती सून
मिळालेल्या माहितीनुसार, अरवा मूर्ताझा बोहरा या मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती भागातील प्रसिद्ध व्यावसायीक हुसैनी हार्डवेअरचे संचालक अखत्तर हुसेन अकबर अली सैफी यांची लहान सून. मूर्ताझा हुसैन सैफी यांच्यासोबत २०१८ मध्ये विवाह झाला होता.




















