राज्यात पेट्रोलच्या करात 5 रुपये आणि डिझेलच्या करात 3 रुपये कपात केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज रात्री 12 वाजेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रिमंडळ बैठक झाली. बैठकीत लोकहिताचे अनेक निर्णय घेतल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यातील नागरिकांना आज मध्यरात्री 12 वाजेपासूनच पेट्रोल 5 रुपये, तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त मिळेल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
- सरपंच, नगराध्यक्षांची निवड थेट लोकांमधून होणार
- 18 ते 59 वयापर्यंतच्या नागरिकांना मोफत बुस्टर डोस
- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान, पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना योजनेतून वगळणार नाही
- राज्यात ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान’ राबवणार
- बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देणार. त्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा करणार.
- आणीबाणीच्या कालावधीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन देणार. 31 जुलै, 2020 रोजी ही योजना बंद करण्यात आली होती.
मविआवर टीका
पेट्रोल-डिझेलच्या करात कपात करण्यावरुन एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारला अप्रत्यक्ष टोला लगावला. एकनाथ शिंदे म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. त्यामुळे देशात इंधनाचे दर वाढले होते. मात्र, केंद्राने 4 नोव्हेंबर 2021 रोजी आणि 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या करात कपात केली होती. त्यानंतर राज्यांनीदेखील अशा पद्धतीने दिलासा देण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले होते. मात्र, काही राज्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता राज्यात पुन्हा युतीचे सरकार आले आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन सामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे म्हणाले.
