मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानं विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर वेग घेतला. विधानपरिषद निवडणुकीत राज्यसभा निवडणुकीप्रमाणं भाजप संख्याबळापेक्षा अधिक मतं मिळवत ५ जागांवर विजय मिळवला. तर, महाविकास आघाडीकडे संख्याबळ असून देखील त्यांच्या एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीनं विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादीनं रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, भाजपनं प्रविण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे या पाच जणांना उमेदवारी दिली होती. एकूण ११ उमेदवारांपैकी काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. उद्या विधिमंडळात निर्वाचित १० आमदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
हे घेणार शपथ
भाजपचे प्रविण दरेकर, प्रा. राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी, काँग्रेसचे अशोक ऊर्फ भाई जगताप हे १० सन्माननीय सदस्य मान्यवरांच्या उपस्थितीत शपथ घेतील.




















