चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी चाळीसगाव शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून भरघोस निधी आणेल असा शब्द शहर वासियांना दिला होता. त्यांच्या मागणीची व अडचणीत असणाऱ्या शहरवासियांची तत्काळ दखल घेत महत्वाच्या रस्ते सुधारणा कामांसाठी नगरविकास विभागाने ५ कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच प्राप्त झाला असून त्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, “शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गेली अडीच वर्षे राज्यात सत्ता नसताना देखील जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे उभा राहिलो आहे. केवळ शासकीय निधीच्या भरवश्यावर न राहता प्रसंगी पदरमोड केला पण नागरिकांना अडचणीत राहू दिले नाही. आता राज्यात भाजपा – शिवसेना युतीचे आपले सरकार आले असून येणाऱ्या काळात देखील शहराच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून विविध प्रश्न सोडवून, शहर समस्यामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहील”असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
पावसाळ्यात नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता दोन दिवसांपासूनच आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चाने रस्ते दुरुस्ती कामाला सुरुवात केली होती. शहर वासियांच्या अडचणीच्या काळात धावून आल्यामुळे आमदार चव्हाण यांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. आता या कामांना शासकीय निधीची जोड मिळाल्यामुळे शहरवासीयांची रस्त्यांच्या समस्यांमधून कायमची मुक्ती होणार आहे.
५ कोटींच्या निधीतून या ४ रस्त्यांची होणार कामे –
१) हॉटेल दयानंद ते खरजई नाका रस्ता कॉक्रीटीकरण करणे (२ कोटी १५ लक्ष)
२) डी.वाय.एस.पी. ऑफिस धुळे रोड ते यश नगरीतून जाणारा रस्ता डांबरीकरण करणे (९० लक्ष)
३) अभिनव शाळेजवळचा नाका (भडगाव रोड) ते करगाव रस्ता रेल्वे बोगद्याला जोडणारा रस्ता डांबरीकरण करणे.(१ कोटी २५ लक्ष)
४) सदानंद हॉटेल ते पावर हाऊस रोड (७० लक्ष)
सर्वाधिक दुरावस्था असणाऱ्या हॉटेल दयानंद ते खरजई नाका रस्त्याचे होणार कॉक्रीटीकरण
चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागातील जनतेला शहरातील बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समितीशी जोडणारा महत्वाचा रस्ता म्हणून हॉटेल दयानंद ते खरजई नाका या रस्त्याची ओळख आहे. दररोज अवजड वाहनांसह छोट्या मोठ्या अश्या हजारो वाहनांची या रस्त्यावरून वर्दळ असते. तसेच प्रभाग क्रमांक ३ व ५ मधील नागरिकांचा देखील हा मुख्य वापरण्याचा रस्ता आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून ४ वर्षापूर्वी ५० लक्ष रुपये निधी खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते मात्र पाणी निचरा होण्यासाठी जागा नसल्याने काही वर्षातच रस्ता खड्डेमय झाला. या रस्त्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी त्याचे कॉक्रीटीकरणच करावे अशी मागणी होत होती. याचीच दखल घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणसाठी २ कोटी १५ लक्ष इतका भरीव निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या रस्त्याची समस्या निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जुन्या प्रभाग क्रमांक १ मधील यश नगरी व परिसरातील नागरिकांच्या मागणीची आमदारांनी घेतली दखल
चाळीसगाव शहरात सुरु असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे जुन्या प्रभाग क्र.मधील यश नगरी कडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती. प्रभागातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन वापराचा हा रस्ता आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालता देखील येत नसल्याने स्थानिक नागरिकांनी ही समस्या आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे मांडली होती. सदर कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देईल असे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले होते. या भागातील नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी डी.वाय.एस.पी. ऑफिस धुळे रोड ते यश नगरीतून जाणारा रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी ९० लक्ष रुपये मंजूर केले आहेत.




















