नाशिक : वृत्तसंस्था
दारू पिण्याचे व्यसन असलेल्या मुलाला दारू पिणे बंद कर, असे सांगणाऱ्या वडिलांवर मद्यपी मुलाने लोखंडी पहारीने हल्ला करत गंभीर जखमी केले. प्रत्युत्तर देताना वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलाच्या वर्मी घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याचा उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. चांदवड पोलिस ठाण्यात वडिलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि प्रकाश कारभारी ठोके (रा. पाटे शिवार, नारायण खेड रोड, ता. चांदवड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता लहान भाऊ रवींद्र ठोके (वय 32) हा मद्य पिऊन घरी आला. वडील कारभारी ठोके ( वय 60) यांना म्हणाला की, माझे लग्न करून देणार नाही का? वडिलांनी पहिले दारू पिणे बंद कर असे खडसावले. रवींद्र यास राग आल्याने त्याने वडिलांना शिविगाळ करत घराच्या कोपऱ्यात ठेवलेली लोखंडी पहार घेऊन हल्ला केला.
मुलाच्या हल्ल्यात वडिलांचे डोके फुटले. वडिलांनी प्रतिकार करण्यासाठी लोखंडी पाइप घेत रवींद्र याच्यावर हल्ला केला. डोक्यात पायावर गंभीर मार लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. दोघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना भाऊ रवींद्र याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळल्यानंतर निरीक्षक बावरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करत आहे.




















