मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एक मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाच्या आमदारांची आज बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे १४ खासदार ऑनलाईन उपस्थित होते, असे खात्रीलायक वृत्त आहे. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी नियुक्ती केली आहे. मात्र, पक्षप्रमुख पदाला कायम ठेवण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव आडसूळयांची नेतेपदी नियुक्ती केली. तर आमदार दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड केली आहे. उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड केली आहे. त्यामुळे शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. या बैठकीला शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते.
