मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेनेचे ३९वे आमदार आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. आज सकाळपासून नॉट रिचेबल असलेले सामंत दुपारी सुरतहून रवाना गुवाहटीला पोहचले आहे. त्यामुळे सामंंत यांच्यासह शिंदे गटातील अपक्षांसह आमदारांची संख्या आता ४६वर गेली आहे. अशातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनिल राऊत हे देखील शिंदे गटात सहभागी होण्यासाठी गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
शरद पवारांचे मोठं विधान ; राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तर मग…
खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करताना दिसून येत आहेत. सर्व बंडखोरांना मातोश्रीचे आणि शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद असल्याचा दावा करत आहेत. मात्र आता त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत हेच शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळे शिवसेना घरातच फुटली की काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
मात्र त्याचवेळी यावर बोलताना संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुनिल राऊत हे सध्या मुंबईतच असून त्यांची कांजूरमार्ग येथे सभा सुरु आहे. मी माझे कुटूंब मेले तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत बेईमानी करणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने सुनिल राऊत नाराज असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यानंतर आज ते थेट शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातून त्यांना मनातील धुसफूस दाखवून द्यायची आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.




















