मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! त्यांच्याकडून महाराष्ट्राचे हित जपले जाईल, अशी मला मनापासून आशा आहे. शिंदे म्हणाले की, दिवंगत यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर दुसरा सातारकर मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे.
सायंकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. मात्र, एकनाथ यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी अटकळ आतापर्यंत लावली जात होती.





















