जळगाव : प्रतिनिधी
इंडियन रेडक्रॉस राज्य शाखेच्या माजी सचिव श्रीमती होमाई मोदी यांना जळगाव रेडक्रॉस तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिनांक २५ मार्च रोजी मुंबई येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्या 83 वर्षांच्या होत्या. रेडक्रॉस राज्य शाखेच्या पोलादी महिला म्हणून त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली होती.
रेडक्रॉस राज्य शाखेच्या मानद सचिव पदावर कार्य करीत असताना त्या महिला म्हणून कुठेही मागे राहिल्या नाही. मानवतेच्या दृष्टीकोनातून कार्य करीत असताना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व रेडक्रॉस शाखांना नवनवीन सामाजिक उपक्रमांच्या कल्पना देऊन कार्य करण्यासाठी प्रेरित केले. जळगाव रेडक्रॉसचे निरंतर सेवाकार्य पाहता त्यांनी नेहमीच जळगाव शाखेला प्रथम स्थान दिले.
सचिव पदावर कार्य करीत असताना दोन वेळा त्यांनी जळगाव रेडक्रॉसला कार्यक्रमानिमित्त भेट दिली. लातूर भूकंप असो, गुजरात भूकंप असो किंवा केरळ त्सुनामी असो, श्रीमती होमाई मोदी या स्वतः सर्व स्वयंसेवकांच्या मदतीला उपस्थित राहून अखंडित पणे परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी योगदान दिले. त्यांच्या या समर्पणाबद्दल त्यांना गुजरात भूकंपाच्या वेळी प्रदान केलेल्या सेवांसाठी उत्कृष्ट सेवा पुरस्कार, अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूट, यू.एस.ए. द्वारा 2000 वर्षातील घोषित महिला, सामाजिक कल्याणासाठी शांतता आणि मानवतेसाठी एकतेसाठी महावीर महात्मा पुरस्कार, इंडियन रेडक्रॉस सोसायटी महाराष्ट्र राज्य शाखेला दिलेल्या सेवांसाठी “जीवनगौरव पुरस्कार”, भारतीय रेडक्रॉस सुवर्ण पदक यासारखे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी उपाध्यक्ष गनी मेमन, रेडक्रॉस चेयरमन विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेयरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी स्व. श्रीमती होमाई मोदी यांच्या सामाजिक कार्याची माहिती देत आपल्या भावना व्यक्त केल्या. सोबतच यावेळी कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सुरळकर, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
