मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाटा परिसरात धाडसी कारवाई करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाला, वाहन आणि मोबाईल असा एकूण १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एक संशयित फरार आहे.
फिर्यादी योगराज किशोर सर्ववंशी (वय २६), अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये खलील उर्फ उझा खान (वय ३२, रा. शेगाव रोड, खामगाव, जि. बुलढाणा) व सय्यद आरिफ सय्यद हकीम उर्फ नदिम (वय ३५, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) यांचा समावेश आहे. तर पवन रा. बुरहानपूर (मध्य प्रदेश) हा संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
१७ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजता पुर्णाड फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित MH-30/AZ-4664 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या आर्टिगा कारची तपासणी केली. वाहनात महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला गुटखा, केसरयुक्त विमल पान मसाला व तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. त्यानंतर वाहनासह आरोपींना मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सकाळी अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष मालाची तपासणी करून पंचनामा केला.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये केसरयुक्त विमल पान मसाला – विविध पॅकिंगमधील साठा विमल पान मसाल्याची ११ पाकिटे बिग पॅक स्वरूपातील विमल पान मसाला तंबाखूची पाकिटे व बिग पॅक तंबाखू एकूण प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ किंमत – ₹३,८६,९०८ याशिवाय, पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी आर्टिगा कार – अंदाजे किंमत ₹८,००,००० Vivo कंपनीचे दोन मोबाईल फोन – एकूण किंमत ₹२०,००० असा एकूण ₹१२,०६,९०८ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विविध कायद्यांन्वये गुन्हा आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील संबंधित कलमे तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांची साठवणूक, वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने हा माल आणल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे करीत असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे मुक्ताईनगर परिसरात प्रतिबंधित गुटखा तस्करीविरोधात पोलिस व अन्न सुरक्षा प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.




















