जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२६
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने १५वी ‘भारतीय छात्र संसद’ दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कोथरूड येथील विद्यापीठाच्या विवेकानंद सभामंडपात आयोजित करण्यात आली आहे. तीन दिवसीय या विद्यार्थी संसदेत देशभरातील तरुणांना लोकशाही, नेतृत्व आणि सार्वजनिक धोरणांवर संवाद साधण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती विद्यार्थी समन्वयक विराज कावडीया यांनी दिली.
शनिवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता उद्घाटन सोहळा होणार असून, यावेळी ज्येष्ठ पत्रकार व लेखक पद्मश्री राजदीप सरदेसाई आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील.
सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता होणाऱ्या समारोप सोहळ्यास लोकसभा खासदार अनुराग सिंह ठाकूर आणि खासदार डॉ. संदीप कुमार पाठक उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन व समारोप सोहळ्यांशिवाय लोकशाही, नेतृत्व विकास, शासन आणि सार्वजनिक धोरण या विषयांवर चार स्वतंत्र सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदापासून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना व्यासपीठ देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, विद्यापीठातील १०० वर्गखोल्यांमध्ये तीन दिवसांत सुमारे ४०० तज्ज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक वर्गात पाच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मते मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
दि. २२ फेब्रुवारी रोजी वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “भारताची परीक्षा-केंद्रित शिक्षण व्यवस्था सर्जनशीलतेला मर्यादा घालते” आणि “५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण समानतेस बाधक ठरते” या दोन समकालीन विषयांवर प्रत्येकी दोन संघ सहभागी होणार असून एकूण २० विद्यार्थी आपले मुद्दे मांडणार आहेत.
लोकशाही मूल्यांची जपणूक, संवैधानिक तत्त्वांची जाणीव, नैतिक व सार्वजनिक नेतृत्वाची जडणघडण, शासन रचना आणि सार्वजनिक धोरण प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करणे ही या छात्र संसदेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. विश्लेषणात्मक विचारसरणी, नागरी जबाबदारी आणि सहभागी नेतृत्व बळकट करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या छात्र संसदेचे संरक्षक आहेत. तसेच पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, लोबसांग सांग्ये, न्यायमूर्ती एन. संतोष हेगडे, डॉ. विजय भटकर आणि नानिक रुपानी हे मार्गदर्शक मंडळात सहभागी आहेत. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय तसेच मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुता यासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. राष्ट्रसेवा योजना आणि नेहरू युवा केंद्र यांचाही सक्रिय सहभाग या उपक्रमात आहे.
देशातील राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यम, अभिनय व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणारी ही छात्र संसद विद्यार्थ्यांसाठी नेतृत्व आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. अधिक माहितीसाठी संबंधित संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




















