जळगाव मिरर | १७ नोव्हेबर २०२३
दिवाळीचा उत्साह सर्वत्र सुरु असतांना जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दि.१७ रोजी शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ दहशतवादी ठार झाले. हे पाच दहशतवादी लश्कर-ए-तैयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फोर्सचे (टीआरएफ) असल्याचे सांगण्यात येत आहे. 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुरक्षा दलांना कुलगामच्या सामनू भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर चकमक सुरू झाली.
लष्कराच्या 34व्या राष्ट्रीय रायफल्स, 9 पॅरा (एलिट स्पेशल फोर्स युनिट), सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांचा या कारवाईत सहभाग होता. ही चकमक सुमारे 19 तास चालली. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजता चकमक सुरू झाली. रात्री उशिरा अंधार पडल्याने ते थांबवण्यात आले, मात्र सकाळी पुन्हा गोळीबार सुरू झाला. आज सकाळी झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी मारले गेले. क्रॉस फायरिंगदरम्यान 5 दहशतवादी ज्या घरात लपले होते त्या घराला आग लागली. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे दहशतवाद्यांचे मृतदेह दिसत आहेत.