
जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२४
भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील सोमनाथ नगर, शिवशक्ती कॉलनी भागातील रहिवासी अनिल हरी बहाटे यांच्या राहते घराच्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांने ७ लाख २ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २ रोजी घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लोखंडे वाडा, शिवशक्ती कॉलनीजवळील सोमनाथ नगरात इलेक्ट्रीशियन असलेले अनिल हरी बहऱ्हाटे हे त्यांची पत्नी तथा सेवानिवृत्त शिक्षिका यांच्यासोबत सुमारे १० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. दरम्यान, बऱ्हाटे यांच्या पुतण्याच्या लग्नाच्या मेहंदीचा कार्यक्रम असल्याने हे दाम्पत्य शहरातील वांजोळा रोड, मिरची ग्राऊंड परिसरात सोमवारी दुपारी पावणेतीन वाजता घराला कुलूप लावून बाहेर पडले. दरम्यान, २ रोजी दुपारी २ ते रात्री १० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांने अनिल बऱ्हाटे यांच्या घरात बेडरूमच्या खिडकीचे गज कापून प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ७ लाख २ हजारांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, सोमवारी दिवसभरात मेहंदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर बऱ्हाटे दाम्पत्य रात्री १० वाजता निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी कुलूप उघडून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना किचन व कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केल्याचे निदर्शनास येताच त्यांना मोठा धक्का बसला. तर बाजारपेठ पोलिसांना सूचित केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहूल वाघ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या काही अंतरावरच चोरट्यांनी डल्ला मारून एकप्रकारे खाकीला आवाहन दिले आहे. तर पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी अनिल बऱ्हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करत आहेत.