
जळगाव मिरर | १६ मे २०२६
धरणगाव तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका नराधम मुख्याध्यापकाने चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या १० वर्षाच्या चिमुरडीवर मागील दोन वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात नराधम मुख्याध्यापक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते. ती जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. संशयित आरोपी मुख्याध्यापक नंदलाल मराठे हा तिला शाळा भरण्यापूर्वी सकाळी १० वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून घेत असे. त्यावेळी शाळेत कुणी नसल्याचा फायदा घेऊन तो तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करायचा. इतकेच नव्हे तर तिला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण करत असे. या प्रकाराला विरोध केल्यास तो तिला मारहाण करायचा, तसेच कोणालाही काहिही सांगितल्यास ‘तुझे आई-वडील मरून जातील, अशी धमकी देऊन तिला गप्प बसवत असे. दरम्यान, शाळेला सुट्या लागल्यानंतर सुट्यांमध्ये पीडित मुलगी आपल्या मावशीकडे गेली. तेथेच तिची प्रकृती खालावली तसेच तिने जेवण करणणे ही बंद केले. त्यानंतर नातेवाईकांनी तिला विश्वासात घेतले.
त्यानंतर, तिने रडत रडत तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. दरम्यान, ३० एप्रिल रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशीही या नराधम मुख्याध्यापकाने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुण धरणगांव पोलिसांनी संशयित मुख्याध्यापक नंदलाल मराठे याच्चाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करत आहेत, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून, अशा नराधम मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या घटनेबाबत धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवत नराधम मुख्याध्यापक मराठेला अटक केली. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून नराधम मुख्याध्यापकाला तत्काळ कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे





















