
जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच मुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव बेस्ट बसने बाजारपेठेत घुसून अनेकांना उडवल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, ४२ जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसने १० वाहनांनाही धडक दिली. यामध्ये अनेक वाहनांचा चक्काचूर झाला आहे. बस चालकाने याआधी कोणतेही मोठे वाहन चालवले नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान बेस्ट बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला कुर्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
अपघाताच्या वेळी बसने बाजारपेठेत असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत काही रिक्षांचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळावर जमलेल्या स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना आणि मृतांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मद्यधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.