जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२६
राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यातील गोटन शहरात एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीचा संशयित हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे सुमारे चार महिन्यांपूर्वी तिच्या मोठ्या भावाचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना २३ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ७.४८ वाजता गोटन इंटरनॅशनल स्कूल येथे घडली. तालणपूर येथील रहिवासी राजेंद्र बापेडीया यांची मुलगी दिव्या (वय ९) ही पाचवीत शिकत होती. नेहमीप्रमाणे ती त्या दिवशी शाळेत आली होती. प्रार्थनेस अजून वेळ असल्याने काही विद्यार्थी मैदानावर खेळत होते. त्यात दिव्याही सहभागी होती.
खेळत असताना अचानक दिव्या अडखळून खाली पडली आणि बेशुद्ध झाली. घटनेनंतर शाळेत एकच गोंधळ उडाला. शाळा प्रशासनाने तातडीने तिच्या कुटुंबीयांना कळवले आणि कोणताही विलंब न करता तिला गोटन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
शाळेचे संचालक रामकुंवार ओला यांनी सांगितले की, दिव्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य दुखापतीच्या खुणा नव्हत्या. प्राथमिक तपासणीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कुटुंबीयांनी शवविच्छेदनास नकार दिल्याने मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, दिव्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा मोठा भाऊ अभिषेक याचाही ९ सप्टेंबर २०२५ रोजी अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. तो घरी खेळत असताना अचानक बेशुद्ध पडला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केले होते. एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलांचा अल्पावधीत संशयित हृदयविकाराने मृत्यू झाल्याने वैद्यकीय कारणांबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. या घटनेमुळे गोटन परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




















