
जळगाव मिरर । ३० नोव्हेबर २०२२
देशात सध्या काही घटना अशा घडत आहे त्या हादरवून टाकणाऱ्या आहेत. यामध्ये सर्वच ठिकाणी अल्पवयीन मुली टार्गेट होत असून याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत चालले आहे. इयत्ता 9 वी आणि दहावीत शिकणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हैदराबाद येथील हयातनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ही घटना ऑगस्टमध्ये घडली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर सोमवारी तक्रार दाखल केली.
पाच मुलांपैकी तीनजण 15 वर्षांचे आहेत. एकजण दहावीच्या वर्गातील विद्यार्थी आहे, तर इतर दोघे 14 वर्षांचे आहेत. पीडित मुलगी 17 वर्षांची असून ती दहावीची विद्यार्थिनी आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी मुलांना पॉर्न व्हिडिओ बघण्याची सवय होती. शाळा सुटल्यानंतर अनेकदा ते त्यांच्या मोबाईलवर असे व्हिडिओ पाहायचे. ही सर्व रोजंदारी मजुरांची मुलं आहेत. पीडित मुलगी या मुलांना ओळखत होती. तिच्यावर ऑगस्ट महिन्यात 10 दिवसांच्या कालावधीत दोनदा अत्याचार झाला आहे. या दोन्ही प्रसंगांचं मुलांनी मोबाईलवर चित्रीकरण केलं, असं पोलीस म्हणाले.
मुलांनी मैत्रीचा गैरफायदा घेत घरी कोणी नसताना मुलीचं लैंगिक शोषण केलं. त्यांच्यापैकी एकानं हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. मुलीनं सांगितलं की, ‘त्यांनी व्हिडिओद्वारे मला ब्लॅकमेल केलं आणि 10 दिवसांनी पुन्हा माझं लैंगिक शोषण केलं.’ मुलांनी व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडितेच्या कुटुंबीयांना घटनेचा व्हिडिओ समजल्यानंतर मुलीनं तिच्या पालकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडं जाऊन पाच मुलांविरुद्ध तक्रार दाखल केली, असं एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं.




















