गुढी पाडव्याला काही दिवस उरले आहेत. यंदा 2 एप्रिल रोजी म्हणजेच चैत्र महिन्याच्या आगमनाने नवीन वर्षांची सुरुवात होत आहे. गुढी पाडव्याला पौराणिक महत्त्व आहे. गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी विधिवत पूजन केल्यास आरोग्य, विद्यालाभ, धन लाभासह मनातील इच्छा पूर्ण होतात असे शास्त्रपुराणांत म्हटले आहे. त्यानुसार जाणून घेऊया गुढी म्हणजेच ब्रह्मध्वजाचे पूजन कसे करावे आणि याचे धार्मिक महत्त्व काय आहे.
पौराणिक मान्यता
गुढी पडावा हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा उत्सव आहे. एके काळी संपूर्ण हिंदू समाज चेतनाहिन झाला होता. गुलामीची इतकी सवय झाली होती की ते प्रतिकार शक्तीच घालवून बसले होते. पौराणिक मान्यतेनुसार त्या काळात शालीवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले होते. या मातीच्या सैन्यावर पाणी शिंपडल्यानंतर त्यांच्यात प्राणांचा संचार झाला. या सैन्यांनी शत्रूला पराभूत करत विजय मिळवला त्याच्या प्रित्यर्थ शालिवाहन शक सुरु झाले. तसेच याच दिवशी बालीचा पराभव करुन रामाने दक्षिणेकडील प्रजेला सुखी केले. त्या निमित्त सर्वांनी ध्वज उभारुन आनंदोत्सव साजरा केला. अशी देखील मान्यता आहे की, जेव्हा श्री राम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन केले होते.
जुळून आलाय हा योग –
यंदाच्या गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग एकाच वेळी जुळून येत आहे. यासह चैत्र नवरात्रीची सुरुवात देखील होत आहे. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा खूप लाभदायक ठरणारा आहे. पंचागानुसार 2 एप्रिल, 3 एप्रिल, 4 एप्रिल, 6 एप्रिल, 9 एप्रिल आणि 10 एप्रिल रोजी सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. या दिवशी गुढी म्हणजेच ब्रह्मध्वजाचे विधीवत पूजन करणे महत्त्वाचे आहे
अशी करा पूजा
गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करावे. त्यानंतर दरवाज्याला तोरण बांधावे. वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे. नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे. कलशाला पाच ठिकाणी गंध लावावा. त्यानंतर तांब्याचा कलश उपडा ठेवा. काठीला निंबाचा पाला बांधत चाफ्याच्या फुलांची माळ घालावी. त्यानंतर ब्रह्मध्वजाची ‘ॐ ब्रह्मध्वजाय नमः’ मंत्राचा जाप करत पूजन करा. दरम्यान, कडुलिंबाची कोवळी पाने, चण्याची भिजलेली डाळ, मध, जिरे, हिंग, गूळचा प्रसाद ठेवावा.
