
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तालुक्यातील मारवड येथे सोसायटीला दिलेले स्वस्त धान्य दुकान क्रमांक १०५,१०६ मधून २६ रोजी रात्री वाहन क्रमांक जी जे ०५, सिव्ही ४८२९ मध्ये शासकीय तांदुळाच्या आठ गोण्या घेवून जात असताना रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, उमेश सुर्वे यांनी पकडून महसूल कर्मचाऱ्यांना बोलावले असता सेल्समन अनिल काशिनाथ पाटील दुकानाला कुलूप लावून पळून गेले होते. अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता वाहन चालक प्रशांत विजय पाटील (रा जैतपिर) याने सांगितले की मला दिनेश वडर ( रा मारवड) याने हा माल घेऊन जाण्याबाबत सांगितल्याचे जबाबात म्हटले.रात्रीच दोन्ही दुकाने सील करण्यात आली होती. तर सील केलेली दोन्ही दुकाने नायब तहसीलदार संतोष बावणे यांनी उघडून घटना स्थळाचा पंचनामा केला.
दिवाळी काळात वाटपसाठी असलेली साखरक २ क्विंटल, डाळ १ क्विंटल, व किरकोळ तेल आणि रवा असा माल शिल्लक होता तर अंत्योदय, प्राधान्य योजनेतील धान्य पुस्तकाप्रमाणे अपेक्षित गहू साठा ८५.१३ क्विंटल हवा असताना प्रत्यक्ष ८४ क्विंटल म्हणजे १.१३ क्विंटल कमी आढळून आला तर तांदूळ साठा १२५.२३ क्विंटल अपेक्षित असताना तो १४१.३० क्विंटल म्हणजे १६.०७ क्विंटल जादा आढळून आला. याचा अर्थ ग्राहकांना वाटप करण्यात आला नाही. तसेच दुकानात लाभार्थी याद्या, किरकोळ विक्री दर फलक नाही, दक्षता समिती सदस्य नावे आढळून आली नाही. म्हणून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी आदेश दिल्यानुसार रात्री उशिरा प मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















