
जळगाव मिरर / २५ एप्रिल २०२३ ।
राज्यात १६ एप्रिल रोजी महाराष्ट्र सरकारच्या वतीने डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार देण्यात आला होता. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखोंच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम खारघर येथे मोठ्या उत्साहात पार पडला पण उष्माघाताने १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
त्याच दरम्यान डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांच्या लेटरहेडवर आपलं म्हणणे मांडलं होतं. त्यामध्ये त्यांनी श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केले होते. त्यानंतर त्याच पत्राचा आधार घेऊन? सोशल मिडियावर सरकारच्या विरोधात डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी कसे गेले आहेत. आणि भाजप आणि सेनेला मदत करू नका अशा आशयाचे बनावट पत्र व्हायरल झाले होते. त्यानंतर खरे की खोटे पत्र याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. त्यानंतर रायगड पोलिसांनी याबाबत दखल घेऊन गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रायगड पोलिसांनी पुण्यात येऊन कारवाई केली आहे. हे पत्र बनवून शेयर करणाऱ्या शुभम काळे या तरुणाला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
बनावट पत्रातील मजकूर काय होता?
राज्य सरकारच्या गलिच्छ कारभारामुळे मला व माझ्या साधकांना त्रास झाला, मी पुरस्कार नको बोललो होतो, मला जबरदस्तीने पुरस्कार घ्यायला भाग पाडले. माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला व त्यांचा जीव घेतला, माझ्या साधकांसाठी साधा मंडप ही टाकला नाही. वरुन भाजप चे मुनगंटीवार बोलतात मीच सांगितला कार्यक्रम दुपारी घ्यायला, हो मी सांगितले दुपारी घ्यायला, पण त्यांनी तशी सोय पण करायला हवी होती. झालेल्या घटनेची मी पुर्ण जबाबदारी घेऊन सर्व श्री सेवकांची माफी मागतो. माझ्या सर्व श्री सेवक मी आवाहन करतो की इथून पुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका. मी लवकरच पुरस्कार आणि राशी सरकारला परत करत आहे. जय सदगुरू, असा मजकूर असलेले बनावट पत्रक व्हायरल करण्यात आले होते.