जळगाव मिरर | ५ मे २०२३
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी २ मे रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकारण तापले होते. शरद पवार यांनीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर राहावं, अशी मागणी मागील दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात शरद पवार यांनी अध्यक्ष पदाच्या निवडी संदर्भामध्ये नेमलेल्या समितीची बैठक पार पडली.
या बैठकीतून सर्वात मोठी बातमी समोर आली असून शरद पवार यांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळून लावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीने शरद पवार यांच्या राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव या बैठकीत मांडला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांनी पुन्हा अध्यक्ष व्हावे, असा ठराव बैठकीत मांडण्यात आला आहे.
त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काल शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेवून तुमच्या मनासारखा निर्णय घेवू असे आश्वासन दिले होते. मात्र तरीही कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. आज एका कार्यकर्त्याने आंदोलनादरम्यान आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे….
