
जळगाव मिरर | ३० मे २०२३
गेल्या काही दिवसापासून राज्यात मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा सुरु आहे. तसेच मुंबईत आर्द्रता असल्याने उकाडा असह्य होत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा खाली येत असला तरी उष्णतेच्या झळा अजूनही कायम आहेत.
त्यातच आता राज्यात मान्सून लवकरच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राज्यातील काही भागात बुधवारपर्यंत मॉन्सूनपूर्व पाऊस म्हणजेच वळवाचा पाऊस येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, कोकण किनारपट्टी भागात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवसात वळवाचा पाऊस येण्याची शक्यता आहे.
सध्या मान्सूनची वाटचाल गतीने सुरू असून कोणताही अडथळा नाही. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून तो वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. एकीकडे हवामान खात्याकडून देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच दुसरीकडे काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा तडाखा बसणार असल्याचीही शक्यता आहे.





















