जळगाव मिरर । ४ जून २०२३
नैऋत्य मान्सून काल केरळमध्ये पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान जळगाव जिल्यात अनेक ठिकाणी वाढली वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे अनेकांची त्रेता तिरपीट उडाली होती. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून बऱ्याच वेळेपर्यंत वीजपुरवठा देखील खंडित झाला होता, पारोळा, पाचोरा, भातखंडे, जामनेर, शेंदुर्णी, यावल, मनवेल या ठिकाणी पावसाने व वादळी वाऱ्याने बरेच नुकसान केले तर पारोळा तालुक्यातील सबगव्हाण येथे वीज पडून एक युवक ठार झाल्याची घटना घडली.

जळगाव शहरात देखील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने अनेक झाडे उन्मळून पडली, तर बऱ्याच ठिकाणी वीजतारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. आमदार राजू मामा भोळे यांनी शहर मनपा अभियंता चंद्रकांत सोनगिरी यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थेला दूरध्वनीद्वारे माहिती प्राप्त झाल्यावर तात्काळ घटनास्थळी युद्ध पातळीवर कामगार यंत्रणेला पाचरण करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरी यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली व उन्मळून पडलेल्या झाडांना तात्काळ बाजूला करून रहदारीसाठी मार्ग मोकळा केला.
जिल्हाभरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे अनेकांची तारांबर उडाली होती. पारोळा शहरात सकाळी सुमारे अकरा वाजेच्या आसपास वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. रविवार हा पारोळ्यातील बाजाराचा दिवस असल्याने अनेक लहान मोठ्या व्यवसायिकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी चांगलीच कसरत केली. बाजारात अनेक ग्राहकांनी देखील पावसामुळे काढता पाय घेतला. तर डीपीवर झाड पडल्याने शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पारोळा तालुक्यातील सबगव्हाण येथे विज पडून २६ वर्षिय तरूण ठार झाल्याची घटना घडली. सबगव्हाण येथील रहिवासी सुनिल आबाजी भिल २६ रा सबगव्हाण हा शेतात काम करीत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी तो व त्याचा सोबत असलेल्या व्यक्ती निंबाच्या झाडाखाली उभे असताना सुनिल भिल यांच्या अंगावर विज पडली.
यावेळी शेतमालक शरद गोपिचंद पाटील यांनी खाजगी वाहनाने त्याला पारोळा येथील कुटीर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत. पाचोरा तालुक्यात देखील सुसाट वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी आल्या. मात्र वादळी वाऱ्याने अनेकांची घरावरील पत्रे उडून गेली, तर भर रस्त्यात झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने नुकसान झाले. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. भडगाव रोडवरील निर्मल उद्यान जवळ झाडाची फांदी पडल्याने चहाच्या टपरी धारकाचे मोठे नुकसान झाले. तसेच जारगाव चौफुली जवळ व्यंकटेश गोपाल मंगल कार्यालयाची भिंत पडल्याने नुकसान झाले. सुदैवाने या ठिकाणी कोणताही कार्यक्रम नसल्याने जीवित हानी टळली.
ग्रामीण भागात देखील शेतकऱ्यांनी ठिबक मिळण्यापासून ठेवल्या होत्या. वादळी वाऱ्यामुळे त्या एकत्र झाल्या तर अनेक शेतकऱ्यांचे लिंबू बागांचे नुकसान झाले आहे. भातखंडे परिसरात देखील बारा वाजेच्या सुमारास अर्धा तास वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. भातखंडे सह परिसरामध्ये लिंबू आंबाच्या भागांचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई साठी तलाठ्यांमार्फत तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी दयानंद यादव पाटील यांच्या शेतातील शिवारात साडेतीन हजार केळीचे घड पूर्णपणे जमीन दोस्त झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. सात लाखापर्यंतचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, सादर शेतकरी पिक विमा काढण्यासाठी गेल्या काही दिवसापासून प्रयत्न करत होता. मात्र वेबसाईटला तांत्रिक अडचणी असल्यामुळे पिक विमा काढला गेला नाही, असे संबंधित शेतकऱ्याने सांगितले.
लोहारा परिसरातही मुख्य रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या डीपीवर सिमेंटचे दोन पोल तुटून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर यावल तालुक्यातील साखळी परिसरातही वादळाचा फार मोठा तडाखा बसला आहे. साखळी सह परिसरात अनेक हेक्टर केळीबाग जमीन दोस्त झाली असून मोठमोठे झाडे अक्षरशा गिरक्या घेत खाली पडल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी धास्तावला आहे.
यावल तालुक्यातील साखळी, शिरसाड, मनवेल, थोरगव्हाण, शिरागड, पिळोदा, चुंचाळे, बोराडे या गावांसह परिसरात अनेक गावांना पावसाने तडाखा दिला. त्यामुळे अनेकांच्या गोठ्यांची पत्रे उडून गेल्याने बरेच नुकसान झाले. मुजुमदार कॉलनीत एका घरावर झाडाची फांदी पडल्याने नुकसान झाले असून सुदैवाने घरात कोणी नसल्यामुळे जीवित हानी टळली.
वादळी वाऱ्याचा वेग इतका भयंकर होता की शेतातून घरी येणाऱ्या शेतमजुरांना रस्ता दिसत नव्हता. झालेल्या नुकसानीची आमदार खासदारांनी व तलाठी यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई संदर्भात पाठपुरावा करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.




















