जळगाव मिरर | १५ जून २०२३
राज्यातील महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला अजित पवार यांचे विश्वासू मानले जाणारे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी जबर धक्का देत त्यांनी हैदराबाद येथील मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंद्यात राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसापुर्वी घनश्याम शेलार यांनी बीआरएस’चे प्रमुख व मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची हैदराबाद येथे पक्ष प्रवेशासंबधी भेट घेतली होती. त्या अनुशंगाने शेलार यांची बीआरएस पक्षात प्रवेश करणार होते, राव यांच्या पक्षाकडून निमंत्रण आल्याने शेलार आणि त्यांचे समर्थकनी हैद्राबादकडे रवाना होवून तेथील हॉटेल द पॅलेस येथे पाहुणचार घेतला. त्यानंतर आज शेलार यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षात जाहीर प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी त्यांच्या पक्षाचा विस्तार महाराष्ट्रातही करण्यास सुरुवात केली आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश घेतला होता. दरम्यान, आता थेट राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षानेच केसीआर यांच्या पक्षात प्रवेश केलाय.
शरद पवार यांचे विश्वासू असलेल्या घनश्याम शेलार यांच्या बीआरएस प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. घनश्याम शेलार यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभूत व्हावं लागलं होतं. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांचा पराभव केला होता. अवघ्या ७५० मतांनी घनश्याम शेलार यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
