
जळगाव मिरर । २१ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात कावड यात्रा निघत आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने तरुणासह महिलांचा समावेश असून याच कावड यात्रेनिमित्त रामेश्वर त्रिसंगमावर कावड यात्रेसोबत आलेले एरंडोल शहरातील तीन तरुण नदीपात्रात बुडाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. तापी पात्रात बुडालेल्या तिघांचा शोध घेतला जात असून त्यातील दोघांचे मृतदेह आढळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यावरून आपत्ती व्यवस्थापनाचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले असून तिसर्या बेपत्ताचा तरुणाचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज श्रावण सोमवारनिमित्त जळगाव जिल्ह्यातील महादेव मंदीरात विविध कार्यक्रम साजरे होत असून अनेक भाविक भक्त कावड यात्रेचे आयोजन करून महादेव मंदीरावर दर्शनासाठी आले असून एरंडोल शहरातील काही तरूण हे २१ ऑगस्ट सोमवार रोजी पहाटे चार वाजता वाहनातून जळगाव तालुक्यातील गिरणा-तापी या त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदीरावर दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर काही तरुण तापी पात्रात स्नानासाठी उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आणल्याने तिघे बुडाले. सोबतच्या तरुणांनी याप्रकाराची माहिती स्थानिकांना व प्रशासनाला दिल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.
तिघे तरुण तापी पात्रात बुडाल्याची माहिती कळताच पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पट्टीच्या पोहणार्या तरूणांकडून बुडालेल्या तरुणांचा शोध घेतला जात असताना दोन तरुणांचे मृतदेहच हाती आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली तर तिसर्या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परीरविक्षाधीत उपविभागीय अधिकारी अप्पासो पवार यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने एरंडोल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.





















